दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पुणेकरांचा निरोप घेत माउलींच्या पालखीने गुरुवारी दुपारी कडक उन्हात दिवे घाटाची अवघड वळणे अगदी सहजपणे पार केली. घाटात चार-पाच किलोमीटर चालल्यानंतर मला घाम फुटला. मात्र साठी ओलांडलेले वारकरीही हरिपाठातील ओव्या म्हणत उत्साहाने घाटातील वाट चढताहेत, हे पाहून मला टीव्हीवर काही वर्षांपूर्वी येणाऱया "साठ साल के बुढे, या साठ साल के जवान' या जाहिरातीची आठवण झाली. महाराष्ट्राच्या "माती'त मोठी झालेली ही माणसं भलतीच दणकट. त्यात लाडक्या विठूरायाच्या भेटीला जाण्याच्या आनंदाने त्यांना कशाचीच तमा नसते. ऊन असू दे, पाऊस पडू दे, त्यांचं वारीतील नित्योपचार परंपरेप्रमाणे आणि वेळेत पार पडतात.

सकाळी हडपसरमध्ये विसाव्याची वेळी वसंत ऊर्फ संतानाना चोपदार यांच्याशी गप्पा झाल्या. सोहळ्यात चोपदारांना खूप महत्त्व. संपूर्ण पालखीचं नियंत्रणच चोपदारांकडं असतं. पालखीसोहळा प्रमुखही चोपदारांशी बोलूनच सर्व काही नियोजन करतात. कालच पुण्यात झालेल्या बैठकीत राज्याचे विधी व न्यायमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वारकरी कोण, असा एक नवाच आणि वादग्रस्त प्रश्न उपस्थित केला होता. साहजिकच संतानानांशी बोलताना तो विषय आलाच. त्यावर संतानानांच उत्तर अगदी समर्पक होतं. भिकारी होऊन वारीची वाट चालतो तो वारकरी. नुसती माळ घातली की सगळी कर्म होत नाहीत. त्यागाची संकल्पनाही तितकीच महत्त्वाची आहे. वारकऱयांना कशाचीच अपेक्षा नको. वारी करायची, एकादशीला चंद्रभागेत स्नान करायचे, नामदेव पायरीचे दर्शन घ्यायचे आणि मंदिर प्रदक्षिणा करून आपापल्या गावी परतायचे.
संतानाना जे बोलले ते पटण्यासारखंच आहे. वारीत चालणारे वारकरी बघितले, की ते जाणवतंही. खरंच त्यांना कोणती समिती, त्यावरचे प्रतिनिधी, त्यामागचं राजकारण या कशाचीच काही घेणंदेणं नाही. वारीचे दिवस जवळ आले, की शेतातली काम आटपायची. मोजक्या सामानाबरोबर आळंदी गाठायची. घरदार, मुलगा-मुलगी, सून नातवंड सगळ्यांना विसरून पंधरा-वीस दिवस ज्ञानोबा-तुकोबांच्या नामस्मरणात, विठूरायाला भेटण्याच्या आनंदात घालवायची. जे मिळेल ते खायचं, पाऊस पाण्यात मिळेल तेवढ्या जागेत घटकाभर विश्रांती घ्यायची. काही झाले तरी चालेल, वारीतील नित्योपचार चुकवायचे नाहीत. कोणालाही आदर्श वाटेल, अशीच ही जीवनपद्धती.
वारीला जायचं म्हणून काल घरी बॅग भरली, त्यावेळी एक मोठी बॅगपॅक, लॅपटॉप बॅग एवढं सगळं भरल्यानंतरही मला पुढच्या १५ दिवसांसाठी एवढ्या सामानावर आपलं भागेल का, असा प्रश्न पडला होता. वारकरी एका शबनममध्ये बसेल, एवढंच सामान घेऊन येतात. त्यावरच ते १५ दिवस काढतात. त्यांच्या गरजाच अतिशय लिमिटेड. आपण मात्र अनलिमिटेडच्या जमान्यात वाढतोय. मोबाईलच्या प्लॅनपासून ते आयुष्याच्या विम्यापर्यंत आपल्याला सगळंच अनलिमिटेड हवंय. काय योग्य आणि काय अयोग्य मला खरंच ठरवता येत नाहीये. प्रत्येक दिवशी वारकऱयांकडून मला नवीन शिकायला मिळतंय, एवढं खरं
शेवटी एकच...
इतुले करी भलत्यापरी,
परद्रव्य परनारी,
सोडूनिया अभिलाषा अंतरी,
वर ते व्यवहारी सुखरूप.
No comments:
Post a Comment